लेख २५
*थंडीत वाढणारा कफ दोष कसा टाळाल*
आयुर्वेदाच्या सिद्धांताप्रमाणे थंडीच्या दिवसात शरीरात कफदोष साठतो . याचा अर्थ अन्न पचनानंतर कफदोषाची वाढ जास्त होते. कफदोष थंड आहे. तो जास्त बनू नये अशी योजना सतत चालू ठेवली पाहिजे. गोड पदार्थ व आंबट पदार्थ कफकारक असतात. ते नुसते न खाता त्यांच्याबरोबर, त्यांच्या आधी, त्यांच्या नंतर कफनाशक असे पदार्थ हळद, मेथी, तिखट आले, हिंग, लसूण वापरण्याचे भान सतत ठेवले पाहिजे. उन्हाळ्यात ओले सरपण सुद्धा जळते. तसेच उष्ण प्रकृतीच्या माणसांना पेरु, केळी, चिंचा, बोरे, आवळे, थंड पाणी, दूध, दही, ताक याची बाधा होत नाही. मात्र थंड प्रकृतीच्या लोकांना हे सगळे पदार्थ नुसते वर्ज्य करुन भागत नाही. तर ते कसे खावेत याच्या युक्त्या माहिती पाहिजेत. आले, सुंठ, ओवा, मिरे, लसूण, बिब्बा, हिंग याचा सतत उपयोग थंडीत युक्तीने चालू ठेवला पाहिजे. *या दिवसात दूध,दहि,साखर,ज्युस, केळी,चिकु,सिताफ़ळ, श्रीखंड,शिखरण करुन चालणार नाही*. तसे केल्यास सर्दीच्या त्रासातून थोरांची व मुलांची कधीच सुटका होणार नाही. असे पदार्थ खाणार असल्यास त्यात गरजेनुसार गूळ, हळद इ उष्ण पदार्थ घातले पाहिजे व आधी नंतर हिंगाष्टक चूर्ण,लवणभास्कर इ.औषधं खाण्यात असले पाहिजेत.