सोनं म्हटल की आपल्या डोळ्यासमोर सहजच तांबूस रंगाची वलय संपत्तीच्या भूरसट कल्पकतेतून जन्मास येते.म…
सोनं म्हटल की आपल्या डोळ्यासमोर सहजच तांबूस रंगाची वलय संपत्तीच्या भूरसट कल्पकतेतून जन्मास येते.मात्र या व्यतिरिक्त जगात अपरिमित अशा सोन्याची अनेक रूपे आहेत.निसर्गातल्या अशा अनाकलनीय सुवर्णतुल्य गोष्टींशी आपण अनभिज्ञ असतो.अशीच काहीशी सोन्याला लाजवेल अशी गुणात्मकता घेवून जंगलांमध्ये काहीवेळा रस्त्यांच्या कडेने, एक वेलवर्गीय वनस्पती झाडाझुडपांच्या सोबतीने वाढते.ती म्हणजे गुंज ! बऱ्याच जणांना अगदी लहानपणी या गुंजावळ्यांचा संचय करायची कदाचित हौस देखील असावी.मात्र या लाल - काळया रंगाच्या बिया कुणी पाहिल्या नसतील अस क्वचितच असेल.फार पूर्वीपासून आपल्या दैनंदिन व्यवहारात या बिया वापरल्या जायच्या.त्या इतक्या अमूल्य होत्या की पूर्वी सोने मोजायला त्यांचा उपयोग केला जाई.ढोबळमानाने का होईना पण , एखाद्या वनस्पतीच्या बीजाला त्या काळी सुवर्णतुल्य समजल जात होतं.साधारण पावसाळ्यात या जमिनीत पडलेल्या बियांमधून अंकुरित होवून २ महिन्यांच्या अवधीत,छोट्या - छोट्या पानांच्या गर्दीतून हा वेल वाढत जातो.हिरव्या झूडपांच्या सोबतीने या वेलींचा चमू विस्तारतो अन् फिकट जांभाळट गुलाबी फुलांच्या तुऱ्यांमधून ही वेल शाकारते. विलोभनीय पुष्पसंभार मावळत असतानाच फुलांच्या खालच्या बाजूला हिरव्या शेंगा लगडलेल्या दिसतात.शेंगांच्या आत ७-८ बिया तयार होतात.मात्र परिपक्व झाल्याशिवाय त्या कुणाला दिसत नाहीत.प्रखर उन्हाच्या तडाख्याने सुलाखून निघालेल्या शेंगा आपल्या अंतरंगातला हा तप्त खजिना दर्शनासाठी खुला करतात. छोट्या-छोट्या लालेलाल बियांना मध्येच काळया रंगाचा एक बिंदू अधोरेखित करतो अन् अशा ४-५ खुललेल्या सुक्या शेंगांच्या सालींमध्ये बियांचे कुंचले विखुरले जातात.