*आयुर्वेदीय आहारातून स्वास्थरक्षण*
मानवी जीवनाचे तीन महत्त्वाचे भाग (उपस्तंभ) असतात, असे आयुर्वेद मानतो. आहार हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आयुर्वेदाने आहाराविषयी सखोल असा अभ्यास केला आहे. *|| प्रयोजनं चास्य स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमनं च ॥* आयुर्वेदाचे प्रयोजन हे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणे आणि विकार उत्पन्न झाला तर तो बरा करणे आहे. *' अष्टौ आहार विधी विशेषायतन '* असे आयुर्वेदामध्ये आहाराविषयी म्हटले आहे. म्हणजे आहार घेताना तो आठ पद्धतीने घ्यावा, असे आयुर्वेदाला अपेक्षित आहे. उदाहरणार्थ काय खावं, काय खाऊ नये, किती प्रमाणात खावं, जेवताना कसं बसावं, आहारात पदार्थ काय असावेत, त्यामध्ये किती रसांचा ( कडू , तुरट, गोड, खारट, आंबट आणि तिखट अशा चवींना आयुर्वेदात रस असे म्हटले जाते.) समावेश असावा या गोष्टी यामध्ये येतात. आयुर्वेदाप्रमाणे आपल्या आहाराचा क्रम हा कायम मधुर म्हणजे गोड रसापासून सुरू करावा, कारण गोड रस हा स्वभावाने अतिशय गुरू असल्याने त्याच्या पचनास वेळ लागतो. म्हणून गोड रस म्हणजेच ' डेझर्ट ' हे सुरुवातीला खावेत, त्यामागोमाग अम्ल (आंबट), लवण (मीठ युक्त), कटू (तिखट), तिक्त (कडू) आणि शेवट हा कषाय (तुरट) रसाने करावा म्हणजेच ताक किंवा विड्याचे पान. म्हणजे जेवण उत्तम पचते आणि आरोग्य उत्तम राहते. *॥ रोगः सर्वेऽपि मन्दाग्नौ ॥* *सर्व रोगांचे मूळ हे मंद अग्नी आहे .* आपला अग्नी जर मंद असेल तर आजार दूर नाही. त्यासाठी औषधी चिकित्सा आहेच. मात्र आहार जर सुयोग्य असेल तर औषधांची गरज भासत नाही.